जपान मध्ये पुन्हा भूकंप, त्सुनामी टळली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ मार्च । जपान मध्ये बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास भूकंपाचे तीव्र झटके जाणवले असून या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.३ इतकी मोजली गेली. भूकंपामुळे मालमत्तेचे किती नुकसान झाले याचा अंदाज अद्यापि आलेला नाही. मात्र या भूकंपात दोन लोकांचा मृत्यू आणि ९० लोक जखमी झाल्याचे समजते. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिला गेला होता. पण त्सुमानीच्या लाटा आल्या नाहीत त्यामुळे हा इशारा मागे घेतला गेला आहे.

भूकंपाचे केंद्र टोक्यो पासून २९७ किमीवर उत्तर पश्चिम जपान मध्ये फुकुशिमा तटावर होते. जपानच्या हवामान खात्याकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार हे केंद्र समुद्रात ६० किमी खोल होते. २०११ साली जपान मध्ये झालेल्या ९ रिश्टर स्केलचा प्रलयंकारी भूकंप याच भागात झाला होता. आणि त्यावेळी आलेल्या महाप्रचंड त्सुनामी मध्ये त्या ठिकाणी असलेल्या फुकुशिमा अणुभट्टीला इजा होऊन त्यावेळी किरणोत्सर्ग झाला होता.

एएफपी न्यूज नुसार टोक्यो पॉवर कंपनीच्या हवाल्याने दिल्या गेलेल्या माहितीत या भूकंपामुळे २० लाख घरांची वीज गेली आहे. त्यात टोक्योतील सात लाख घरे सामील आहेत. जपान हा देश पॅसिफिक रिंग ऑफ फायर वर वसलेला असून हे तीव्र भूकंप क्षेत्र म्हणून ओळखले जाते. जपान सरकारने भूकंप संदर्भात कडक नियम केले आहेत त्यानुसार तीव्र भूकंपात सुद्धा मजबूत राहतील अशी घरे बांधली जातात. २०११ सालच्या भुकंपानंतर आलेल्या त्सुनामी मुळे १८५०० नागरिक ठार अथवा बेपत्ता झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *