महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । राज्यात उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. तर मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरीपुढे आहे.
राजस्थानपासून गुजरातपर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली होती. मुंबई परिसराचे कमाल तापमान सरासरीच्या तुनलेत 5 ते 6 अंशांनी वाढले होते. सध्याही मुंबई परिसरातील कमाल तापमान सरासरीच्यचा तुलनेत अधिक आहे. राजस्थान, दक्षिण मध्य प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भातही काही भागात उष्णतेची लाट आली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर आदी भागांतही कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ते 3 ते 4 अंशांनी वाढले आहे. राज्यात आणखी एक ते दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभादानं वर्तवली आहे.
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
अकोला 42.07
जळगाव 42.06
वर्धा 41.04
नागपूर 40.04
अमरावती 41.04
सोलापूर 41.06
नाशिक 39.01
सांगली 40.04
कोल्हापूर 39.05
गोंदिया 39.08
दरम्यान, जळगाव, अकोला, अमरावती, बुलडाणा, सांगली वर्धा, गोंदिया या भागामध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दक्षिण कोकण भागातही तुरळक ठिकाणी आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.