रशिया आणि युक्रेन युद्ध ; जागतिक अर्थव्यवस्थेवर युद्धाचा नकारात्मक परिणाम ; सावधगिरीचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । रशिया आणि युक्रेन यांच्यात २४ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या युद्धावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर या युद्धाचे नकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर अल्प परिणाम दिसेल, तसेच चीन व भारत यांच्यात उडत असलेल्या खटक्यांचाही परिणाम तितकासा व तत्काळ दिसून येणार नाही, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे.

नाणेनिधीच्या जनसंपर्क विभागाचे संचालक गेरी राइस यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेवर युद्धाचा परिणाम अल्प दिसेल. भारताची अर्थव्यवस्था स्थिर गतीने वाटचाल करत असून, या वाटचालीला हातभार लावण्यासाठी अनेक घटक सध्या कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर आर्थिक वातावरण या युद्धामुळे ढवळून निघत असताना भारतीय अर्थव्यवस्था त्यापासून काहीशी संरक्षित राहणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला करोना संसर्गाची बसलेली झळ, त्याचा झालेला गंभीर परिणाम या पार्श्वभूमीवर रशिया – युक्रेन युद्धामुळे बसणारा फटका हा सौम्य आहे. असे असले तरी, आांतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले कच्च्या खनिज तेलाचे दर आणि त्याचा भारताच्या आयातीवर झालेला परिणाम यामुळे स्थूल आर्थिक स्थिती काहीसा परिणाम दिसून येईल, असा इशाराही राइस यांनी दिला.

युद्धामुळे जगात सर्वत्र चलनवाढीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हाच धोका भारतालाही आहे. भारताची निर्यातीची स्थिती चांगली असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात विदेशी चलन देशात येत असल्याने चलनवाढीचा धोकाही सौम्य प्रमाणातच दिसेल. अमेरिका, युरोपीय संघ व चीन यांच्यावर या युद्धाचा नकारात्मक परिणाम होत असल्यामुळे भारतातून या देशांना होणाऱ्या निर्यातीवर त्याचा परिणाम दिसून येईल. त्याच वेळी भारतात आयात होणाऱ्या मालाचा पुरवठा योग्य प्रमाणात व नियमितपणे होत नसल्यामुळे देशांतर्गत महागाईला चालना मिळण्याची भीती आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती अशा प्रकारे कठीण बनल्यास देशांतर्गत मागणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे आर्थिक निर्णयांवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो, अशी भीतीही राइस यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *