महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ मार्च । युक्रेनच्या खार्किव्ह (Russia-Ukraine War) शहरात झालेल्या गोळीबारात कर्नाटकातील (Karnataka) रहिवासी असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना होती. दरम्यान, गोळीबारात प्राण गमावलेला नवीन शेखरप्पा ग्यानगौदार (Naveen Shekharappa Gyanagoudar) याचं पार्थिव आज पहाटे 3 वाजता भारतातील बंगळुरूमध्ये पोहोचलं. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवीन शेखरप्पाला बंगळुरू विमानतळावर श्रध्दांजली वाहून अखेरचा निरोप दिला. यावेळी नवीनच्या कुटुंबीयांनी देखील श्रध्दांजली वाहिलीय.
नवीन हा युक्रेनमधील खार्किव्ह (Kharkiv City) इथं 1 मार्च रोजी रशियन हल्ल्यात ठार झाला होता. नवीन युक्रेनमध्ये वैद्यकिय शिक्षणासाठी गेला होता. आज पहाटे 3 वाजता नवीनचं पार्थिव बंगळुरू विमानतळावर (Bangalore Airport) पोहोचलं. यानंतर नवीनचा मृतदेह कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी नेण्यात आला. बंगळुरू विमानतळावर नवीनला श्रद्धांजली वाहताना कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, अथक प्रयत्नांमुळं नवीनचा मृतदेह इथं कर्नाटकात आणण्यात आला, त्याबद्दल मला भारत सरकारचे आभार मानायचे आहेत. तसेच युक्रेन युद्धात आपण नवीन गमावलाय, हे खूपच दुर्दैव आहे, असं त्यांनी नमूद करत दु:ख व्यक्त केलंय.