महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ मार्च । विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळूनसुद्धा लांबलेल्या शपथविधी सोहळ्यामागे पक्षात सारे काही ठीक आहे, अशी स्थिती नाही. शनिवारी रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांना गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीला बोलावून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सावंत हे रविवारी पहाटे गोव्यात परतले. विश्वजीत राणे यांनीही दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बोलणी केल्यानंतर ते सायंकाळी उशिरा मुंबईत दाखल झाले.
रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बैठकीत गोवा आणि उत्तराखंड राज्यांमधील नेतृत्वाबाबत चर्चा केली. निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील सत्तास्थापनेविषयी उपस्थित केलेल्या मुद्यांवर या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. येथील सत्ता प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात येईल, असा पुनरुच्चारही या बैठकीत झाला. भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीने नियुक्त केलेले कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन उद्या (सोमवारी) गोव्यात दाखल होत आहेत.
भाजपने ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर शपथविधीची तयारी सुरू केली असून हा सोहळा तितकाच दिमाखदार पद्धतीने करण्याचा भाजपचा प्रयत्न असून यासाठी केंद्रातील वरिष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पूर्वनियोजित कामामुळे या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.