बिना तिकीट प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल; वर्षभरात वसूल केला तब्बल २०० कोटींचा दंड

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ मार्च । मध्य रेल्वेकडून नियमित रेल्वे प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. १ एप्रिल २०२१ ते १६ मार्च २०२२ या कालावधीत एकूण ३३.३० लाख प्रकरणे आढळून आली आहेत. याप्रकरणात २००.८५ कोटींचा महसूल वसूल करण्यात आला आहे. हा सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये प्रकरणे आणि महसुलाच्या बाबतीत सर्वाधिक आहे. कोरोना निर्बंध असूनही मध्य रेल्वेची आतापर्यंतची ही सर्वाधिक कमाई आहे.

मध्य रेल्वेकडून नियमितपणे उपनगरीय, मेल, एक्स्प्रेस, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते. महसुलाची गळती रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे दक्षता पथक तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह विनातिकीट प्रवासाविरुद्ध अशा मोहिमा राबवत असतात.

मुंबई विभागाने विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची १२.९३ लाख प्रकरणे शोधून काढली असून, ६६.८४ कोटी वसूल केले आहेत. जे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये सर्वाधिक आहेत. भुसावळ विभागात अनियमित प्रवासाची ८.१५ लाख प्रकरणे आढळून आली असून, ५८.७५ कोटी रुपये, नागपूर विभागात ५.०३ लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून ३३.३२ कोटी, सोलापूर विभागात ३.३६ लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून १९.४२ कोटी, पुणे विभागात २.०५ लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून १०.०५ कोटी आणि मुख्यालयाच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची १.८० लाख प्रकरणे शोधून काढली आणि १२.४७ कोटींची वसुली करण्यात आली. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी तसेच स्वतः च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आणि योग्य आणि वैध रेल्वे तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

५६ हजार व्यक्तींनी केले कोरोना नियमांचे उल्लंघन
एप्रिल ते मार्च या कालावधीत ५६,४४३ व्यक्तींनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि मास्क न परिधान केल्याबद्दल आढळून आले आणि त्यांच्याकडून ८८.७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *