‘असानी’ चक्रीवादळ काही तासांत धडकणार ; जोरदार पावसाची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ मार्च । बंगालच्या (Bengal) उपसागरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आज कायम राहण्याची शक्यता असून असानी चक्रीवादळाचं (Asani Cyclone) आगमन होण्याची शक्यता आहे. जीवित आणि मालमत्तेची होणारी हानी लक्षात घेता लष्करालाही सतर्क करण्यात आलंय. तसेच अंदमान आणि निकोबार बेटांमधील (Andaman and Nicobar Islands) मच्छिमारांना समुद्रात प्रवेश नाकारण्यात आलाय. तर, अंदमान प्रशासनानं सखल भागातून स्थानिक लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केलीय.

दरम्यान, अंदमानमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस देशाच्या उत्तर-पश्चिम भागात तापमानात घट होण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय. भारतीय हवामान खात्यानं (India Meteorological Department) सांगितलं की, उत्तर अंदमान समुद्रावरील दाब मंगळवारी चक्री वादळात तीव्र होऊन बुधवारी म्यानमारची किनारपट्टी ओलांडू शकतं. सोमवारी हे चक्रीवादळ उत्तर अंदमान समुद्रात खोल दाबामध्ये तीव्र झालं होतं. तसेच हे वादळ ताशी 13 किमी वेगानं उत्तरेकडं सरकत होतं. काल सायंकाळी 5.30 वाजता चक्रीवादळ अंदमान बेटांमधील मायाबंदरच्या पूर्व-ईशान्येस सुमारे 120 किमी आणि म्यानमारमधील थांडवे किनार्‍यापासून 570 किमी दक्षिण-नैऋत्येकडं केंद्रित होतं.

आयएमडीनं सोमवारी रात्री 8.30 वाजता जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटलंय, पुढील 12 तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर श्रीलंकेनं सुचविल्यानुसार या हवामान प्रणालीला ‘असानी’ असं नाव दिलं जाईल. अंदमान बेटांपासून जवळ-जवळ उत्तरेकडं हे वादळ सरकत राहील आणि आज 23 मार्चच्या पहाटे थांडवेच्या (म्यानमार) आसपास 18 डिग्री आणि 19 अक्षांश दरम्यान म्यानमारचा किनारा पार करेल, असा इशारा दिलाय. दरम्यान, उत्तर-मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमान जिल्ह्यांतील सखल भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आलंय, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच खराब हवामानामुळं सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय, 150 NDRF कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केंद्रशासित प्रदेशातील तीनही जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्षही उघडण्यात आले असून हवामान खात्यानं पुढील दोन दिवस अलर्ट जारी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *