किव्ह आणि खारकिव्हमध्ये हवाई हल्ले सुरुच ; शरणागतीस युक्रेनचा नकार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ मार्च । वेढा घातलेल्या मारीउपोलमध्ये शस्त्रे खाली ठेवा आणि पांढरे निशाण फडकावून शरणागती पत्करा, असा रशियाने दिलेला इशारा युक्रेन सरकारने साफ धुडकावून लावला आहे. शरणागतीबाबत कोणतीही चर्चा होणार नाही, असे युक्रेनने स्पष्ट केले आहे. रशियानेही किव्ह आणि खारकिव्ह या शहरांसह युक्रेनच्या सर्व भागांमध्ये हवाई हल्ले सुरुच ठेवले आहेत.

मारिउपोलला रशियाने गेल्या तीन आठवड्यांपासून वेढा घातला आहे. तरीही हे शहर अद्याप रशियाच्या ताब्यात आले नाही. रशियाने काल रात्री या शहरातील नागरिकांना शहर सोडून जाण्यासाठी दोन ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच, युक्रेनी सैन्यानेही शरणागती पत्करण्याचे आवाहन केले होते. मात्र, युक्रेनने त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला.

रशियाचे हल्ले सुरुच

मारीउपोलमध्ये रशियाने काल (ता. २०) एका शाळेवर बाँबफेक केली होती. यावेळी शाळेत चारशे नागरिक आश्रयाला होते. शाळेची इमारत पडल्यानंतर ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकून पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. युक्रेन सरकारने या हल्ल्यातील जीवित हानीबाबत अधिकृत माहिती अद्यापपर्यंत जाहीर केलेली नाही.

 

युद्धभूमीवरील घडामोडी

पोदील जिल्ह्यात तोफगोळ्यांच्या माऱ्यात सहा नागरिकांचा मृत्यू

सुमी शहरावरील रसायन प्रकल्पावर हल्ला

रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत ९०२ सामान्य नागरिकांचा मृत्यू

३४ लाख जणांचे शेजारील देशांमध्ये स्थलांतर

रशियन लोकांचेही पलायन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *