Weather Forecast: दक्षिण कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ मार्च । आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या डीप डिप्रेशनमुळे देशात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा घसरला आहे. महाराष्ट्रात देखील उन्हाचा कडाका (Temperature in Maharashtra) कमी झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मार्च महिना सुरू होताच महाराष्ट्रासह मध्य भारतात अनेक ठिकाणी सूर्याने आग ओकायला सुरुवात केली होती. ठाण्यात कमाल तापमानाने 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या शरीराची लाहीलाही झाली होती.

दरम्यान, आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या डीप डिप्रेशनमुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंशाची घट झाली. पण राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा 20 अंशाहून अधिक नोंदला गेला. तसेच कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात देखील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. पुढील चार दिवस दक्षिण कोकण आणि लगतचा दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती (Cloudy weather) कायम राहणार आहे.

पुढील चार दिवस दक्षिण कोकण आणि लगतचा दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार (Rainfall alert) आहेत. तसेच काही ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच कोकणासह घाट परिसर, मुंबई, ठाणे, नांदेड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आसपासच्या परिसरात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही तासांत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

पुढील चार दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार असून चारही दिवस सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रात कोरडं हवामान राहणार असून हवामान खात्याने राज्यात कुठेही इशारा दिला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *