घरगुती एलपीजी सिलिंडर महाग ; ‘या’ शहरात फक्त १००१

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मार्च । पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर घरगुती एलपीजी सिलिंडर तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्यातच दरवाढीचा चटका मंगळवारी बसला. घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी, तर पेट्रोल-डिझेलमध्ये ८६ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकाच्या सिलिंडरसाठी नागपुरात आता १००१.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

आज होणार, उद्या होणारा म्हणता म्हणता इंधन दरवाढीने मंगळवारचा मुहूर्त साधला. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल १० मार्च रोजी जाहीर झाले. निकाल लागून बरोबर बाराव्या दिवशी झालेल्या या दरवाढीने सामान्यांचे बारा वाजले आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही दरवाढ अशाच गतीने पुढे काही काळ कायम राहणार असून पेट्रोल प्रतिलिटर १२५ रुपयांवर पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक सांगताना विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता म्हणाले, ‘४ नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. त्यानंतर एकही दरबदल झाला नाही. निवडणुकांनंतर दरवाढ होण्याची शक्यता होती. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रुड ऑइलचे दर वाढले आहेत. ही सर्व स्थिती लक्षात घेता पेट्रोल आणि डिझेलचे दर ८६ पैशांनी वाढले आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर पहिल्यांदा हा बदल झाला आहे. त्यानुसार पेट्रोल ११०.५६ आणि डिझेल ९३.३७ रुपये झाले आहे.’ तर, भवानी गॅस एजन्सीचे संचालक प्रतीक जैस्वाल यांनी ‘घरगुती सिलिंडरचे दर ऑक्टोबर महिन्यापासून ९५१.५० रुपये कायम होते. यामध्ये मंगळवारी अचानकपणे ५० रुपयांची वाढ झाली. ही वाढ सामान्यांचे बजेट बिघडविणारी आहे’, असे म्हणाले.

मुंबई-पुण्याहून महाग

नागपुरात सिलिंडरचा दर हा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांच्या तुलनेत अधिक आहे. मुंबईत प्रतिसिलिंडर दर ९४९ रुपये, पुणे ९५२.५०, नाशिक ९५३, औरंगाबाद ९५८.५० रुपये दर आहे. या चारही शहरांच्या तुलनेत नागपुरात सिलिंडरचे दर ५० रुपयांनी जास्त आहेत. त्याचप्रमाणे पेट्रोलचा दरदेखील राज्यातील काही शहरांच्या तुलनेत उपराजधानीत अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *