Russia Ukraine War: युक्रेन शरणागती पत्करेना, युद्ध थांबेना ; रशियाने दिले असे संकेत ; आता अण्वस्त्रांचा वापर करणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मार्च । रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध महिना उलटला तरी निर्णायक स्थितीत पोहोचलेले नाही. युक्रेनकडून झालेल्या चिवट प्रतिकारमुळे रशियाला मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे चवताळलेल्या रशियन सैन्याकडून युक्रेनवर घातक हल्ले केले जात आहेत. क्षेपणास्त्र हल्ले आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेनमधील अनेक शहरे बेचिराख झाली आहेत. युद्ध लांबत चालल्याने आता रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याचदरम्यान, आता रशियाने अण्वस्त्रांचा वापर कधी करणार हे स्पष्टपणे सांगितले आहे.

रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी एका मुलाखतीमध्ये सीएनएनला सांगितले की, रशियाचं संरक्षण धोरण सांगते की, रशिया तेव्हाच अण्वस्त्रांचा वापर करेल, जेव्हा त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यानंतर सुमारे चार आठवड्यांनंतर रशियाने ही माहिती दिली आहे.

पेसकोव्ह यांनी हे विधान केल्यानंतर व्लादिमीर पुतीन अण्वस्त्रांचा वापर करणान नाहीत? असे त्यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, आम्ही देशाच्या सुरक्षेचा विचार करतो आणि ही बाब सार्वजनिक आहे. तुम्ही अण्वस्त्रांच्या वापराबाबतची सर्व कारणे वाचू शकता. त्यामुळे जर आमच्या देशाच्या अस्तित्वाला धोका असेल, तर अण्वस्त्रांचा गरजेनुसार वापर केला जाऊ शकतो. तसेच त्यामध्ये कुठल्याही अन्य कारणांचा उल्लेख नाही आहे.

दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या महिन्यामध्ये रशियाच्या अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने २८ फेब्रुवारी रोजी सांगितले की, त्यांच्या अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्र दलांना उत्तर आणि पॅसिफिक ताफ्याला सज्ज ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध महिनाभर लांबल्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटारेस यांनी मंगळवारी हे युद्ध अनिर्णित असल्याचे म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांनी युद्धाच्या मैदानातून चर्चेच्या टेबलावर यावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *