पेट्राेल-डिझेल वाहनांपेक्षा किंमत असेलेली इलेक्ट्रिक कार येणार ; नितीन गडकरींचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मार्च । इलेक्ट्रिक वाहने घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुशखबर दिली आहे. येत्या केवळ दोन वर्षांत पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक वाहने बाजारात दाखल केली जातील. यासाठी त्यांची इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांशी चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेतील जलद प्रगतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होतील आणि पुढील दोन वर्षांत ही वाहने पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने किंवा त्याहूनही कमी किमतीत असतील, असे त्यांनी सांगितले. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्याने त्याचा विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. याला सामोरे जाण्यासाठी सरकार खरेदीवर अनेक सवलती देत आहे.

गडकरींनी किफायतशीर स्वदेशी इंधनाच्या वापराला चालना देण्याच्या गरजेवर भर देत हे इंधन लवकरच प्रत्यक्षात येईल. तसेच यामुळे प्रदूषण पातळी कमी होत देशातील परिस्थिती सुधारेल. खासदारांना वाहतुकीसाठी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करून गडकरींनी आपापल्या जिल्ह्यात सांडपाण्याचा वापर हरित ऊर्जेत बदलण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले आहे.

हायड्रोजन हा लवकरच सर्वांत स्वस्त इंधन पर्याय असेल. जास्तीत जास्त दोन वर्षांच्या कालावधीत इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटोरिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर, कार, ऑटोरिक्षा यांच्यासारखीच असेल. लिथियम-आयन बॅटरीच्या किमती कमी होत आहेत.
आम्ही झिंक-आयन, ॲल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरीसाठी तंत्रज्ञान विकसित करत आहोत. जर तुम्ही पेट्रोलवर १०० रुपये खर्च करत असाल, तर त्याच वापरासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनावर १० रुपये खर्च करावे लागतील, असे गडकरींनी सांगितले.

इलेक्ट्रिक वाहनांबाबत सरकारची मोठी योजना आहे. अवजड उद्योग राज्यमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली की, फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत अवजड उद्योग मंत्रालयाने देशातील १६ महामार्ग आणि ९ द्रुतगती मार्गांसाठी १५७६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन मंजूर केले आहेत.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला २५ किमी अंतराने किमान एक चार्जिंग स्टेशन बसविण्यात येईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याशिवाय महामार्गाच्या दोन्ही बाजूला १०० किमी अंतराने लांब पल्ल्याची हेवी ड्युटी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *