शेतकरी चिंतेत; वातावरणातील बदलामुळं कांद्याच्या उत्पन्नात मोठी घट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक प्रदेशात ढगाळ वातावरण दिसत आहे. परिणामी याचा पिकांना मोठा फटका बसत आहे. (Weather) ऐन हंगामात येणारे कांदा, आंबा या महत्वाच्या लागवडींवर याचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील (Ahamadnagar) पश्चिम पट्ट्यात उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. मागील नोव्हेंबर महिन्यात कांदा लागवडीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवला होता. यंदाही लहरी वातावरणाचा परिणाम पहायला मिळत आहे. सध्या कांद्यालाही मातीमोल भाव मिळत असल्यानं कांद्यानं शेतकर्‍यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणल्याची स्थिती आहे. (prices fall in onion)

दरम्यान, लहरी वातावरणामुळे कांदा पिकाच्या उत्पन्नात निम्यानं घट झाली आहे. दरवर्षी साधारण माल एकरी उत्पन्न अठरा ते एकोणीस टनापर्यंत मिळते. मात्र, यंदा कांदा पिकाच्या उत्पन्नात निम्यानं घट झाली आहे. खर्चाचं गणित वाढल्यानं किमान मिळकत तरी होणार का असा प्रश्न शेतकऱ्याला अस्वस्थ करत आहे. बाजार समितीत जरी कांद्याला 1 हजार 200 ते 1 हजार 300 रुपयांचा दर मिळत असला तरी जागेवर कांद्याला 700 ते 800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यातच उत्पन्न घटल्याने आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.

या परिसरातील अजूनही बऱ्याच ठिकाणची कांदा काढणी बाकी आहे. एप्रिल महिन्यात सर्व शेतकर्‍यांचा कांदा काढून होईल असा अंदाज आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा सर्व कांदा काढून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येईल, त्यामुळं भावात अजून मोठी घसरण होण्याचे शक्यता आहे. यात भरीस भर म्हणून यंदा या वातावरणाचा परिणामही शेतकऱ्याची चिंता वाढवत आहे. मजूर टंचाई, विजेच्या लपंडाव, रासायनिक खते व औषधांचा वाढता खर्च अशा सर्व अडचणींवर मात करत शेतकरी कांदा विक्री करत असला तरी भाव नसल्यानं बळीराजाच्या डोळ्यांत पाणी भरलेलं चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *