महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ मार्च । राज्यातील 65 हजार 686 शासकीय शाळांपैकी केवळ 1 हजार 624 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. उर्वरित शाळांमध्ये ते बसविण्यासाठी यंदाच्या वर्षी प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत केली.
काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. पुणे शहरात एकाच आठवडय़ात मुलींवरील बलात्काराच्या दोन घटनांकडे त्यांनी लक्ष वेधले आणि जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे व खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी त्यांनी केली. या चर्चेत भाजपचे जयकुमार गोरे, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.
या चर्चेला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने 7 एप्रिल 2016 च्या शासन परिपत्रकान्वये सर्व शाळांना दिलेल्या आहेत. शासनाच्या जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.