![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ मार्च । महाराष्ट्रपेक्षा गुजरात राज्यात इंधनाचे भाव कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमा भागांमध्ये हा ट्रेण्ड दिसून येत आहे. गुजरातच्या पेट्रोल पंपावर महाराष्ट्राच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
गुजरात राज्यात पेट्रोलचे दर महाराष्ट्रपेक्षा प्रति लिटरमागे १५ रुपयांहून अधिक कमी असल्याने महाराष्ट्रातील वाहनधारक आता गुजरात राज्यात पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने नंदुरबारपासून अवघ्या १२ किलोमीटरवर गुजरात राज्याची हद्द सुरु होते. यामुळे महाराष्ट्रातील नागरिक महाराष्ट्रातील पेट्रोल पंप सोडून गुजरात राज्यात पेट्रोल भरण्यासाठी जाताना दिसत आहेत.
मागील पाच दिवसांपासून चार वेळा दरवाढ झाली असून एकूण ३ रुपये २० पैशांनी इंधन महागलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव हे जवळपास १२२ रुपये प्रति लिटर असून डिझेलचे भाव ९४ रुपये लिटरपर्यंत आहेत. दुसरीकडे गुजरातमध्ये पेट्रोलचे भाव ९८ रुपये असून डिझेल ९२ रुपयांच्या जवळपास आहेत.
त्यामुळे जवळपास लीटरमागे १३ ते १५ रुपयांचा फरक पडत असल्याने ग्रामीण भागासह शहरातील नागरिक नंदुरबारपासून १२ किमी जवळ असलेल्या निझर तालुक्यात पेट्रोल भरण्यासाठी जातात. पेट्रोलची टाकी फूल केली तर जवळपास १८० ते २०० रुपये वाचतात म्हणून आम्ही गुजरात राज्यात पेट्रोल भरतो असे महाराष्ट्रातील नंदूरबारमधून गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सांगितले. नंदूरबारमधील एमएच ३९ नंबर प्लेट असणाऱ्या अनेक गाड्या या पेट्रोल पंपावर दिवसभरात पेट्रोल भरुन जातात.
१०० रुपयांच्या इंधनावर ५० रुपयांहून अधिक रक्कम कर म्हणून घेणाऱ्या राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये केंद्रीय करापेक्षा अधिक कर हा राज्य सरकारच्या तिजोरीत जातो. यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय कर हा २७.९ रुपये प्रति लिटर इतका निश्चित करण्यात आलाय. प्रत्येक राज्यामध्ये व्हॅट हा वेगवेगळा आकारला जात असल्याने दरांमधील फरक दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये २५ टक्के व्हॅटबरोबरच १०.१२ रुपये प्रति लिटर कर आणि केंद्र सरकारकडून घेण्यात येणारा कर अशी रक्कम आकारली जाते. त्यातही मुंबई, ठाणे, अमरावती आणि औरंगाबादमध्ये एक टक्का अधिक व्हॅट आकारला जातो.