विदर्भात सूर्य तापणार ; हवामान खात्याने केलं अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ मार्च । आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाची (Low pressure area) तीव्रता सध्या कमी झाली आहे. त्यामुळे संभाव्य ‘असनी’ चक्रीवादळाचा (Asani Cyclone) धोका देखील शमला आहे. पण सध्या बंगालच्या उपसागरात नैऋत्य वारे सक्रिय झाले आहेत. येत्या चोवीस तासात हे वारे ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये जाऊन धडकणार आहेत. त्यामुळे पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून हवामान खात्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दुसरीकडे, हवामान खात्याने आज पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील बहुतांशी भागात वेगवान वारे (Gusty wind) वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग 25 ते 35 किलोमीटर प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 28 ते 29 मार्च दरम्यान राजस्थानातील उत्तरेकडील काही भागात धुळीचे वारे वाहणार आहे. या वाऱ्यांचा वेग देखील 25 ते 35 किलोमीटर प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. तर कर्नाटकातील काही भागात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

एकीकडे देशातील अनेक भागात वेगवान वारे वाहणार असले तरी काही भागात उष्णतेचा चटका वाढणार आहे. आज आणि उद्या गुजरातसह हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेची लाट (heat wave) धडकणार आहे. तर मार्च एंडला विदर्भासह पश्चिम राजस्थान, दक्षिण हरियाणा, पश्चिम मध्य प्रदेशात सूर्य आग ओकणार आहे. 28 ते 30 मार्च दरम्यान संबंधित ठिकाणी सलग तीन दिवस उष्णतेची लाट धडकणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दुपारी उन्हात घराबाहेर न पडण्याचा आणि दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देखील हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

मार्च महिन्यात शेवटच्या चार दिवसांत विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांतील कमाल तापमानाचा पारा 41 ते 43 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. काल अकोल्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असून येथील पारा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यापाठोपाठ अमरावतीत 41.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं आहे. विदर्भातील इतरही सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *