Gudipadwa 2022: गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि गुढी कशी उभारावी जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो. आपल्या राशिचक्राची सुरुवात मेष राशीपासून होते. चैत्र महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. म्हणून चैत्र हा वर्षांतील पहिला महिना आहे. या चैत्र महिन्यात पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. म्हणून त्या नक्षत्रावरून चैत्र हे नाव पडले आहे. तेव्हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हाच वर्षांरंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. महाष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी गुढीपाडव्याचा सण २ एप्रिल २०२२ (शनिवारी) आहे.

गुढीपाडव्याचा मुहूर्त
फाल्गुन अमावास्य १ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी संपलेल. तेव्हा अमवास्या संपल्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी २ एप्रिल २०२२ च्या रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत राहील. तिथीनुसार हा उत्सव २ तारखेला साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.

गुढी कशी उभाराला जाणून घ्या

गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुऊन, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.

ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।
प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।

ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षांचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे. त्यानंतर वर्षभरातील महत्त्वाच्या घटना पीक-पाणी यांची माहिती करून घ्यावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *