महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । नागपूर । दि.२८ मार्च । कार्डधारकांना रेशन दुकानातून स्वस्त दरात गहू, तांदूळ आणि डाळी मिळतात. परंतु, आता या रेशन दुकानांमधून धान्याव्यतिरिक्त बॅंकिंग व्यवहारासोबत रेल्वे, विमान तिकीट आणि एलपीजी सिलिंडरचेही बुकिंग करता येईल. शिवाय, वीज, पाणी बिल भरण्यासह अन्य सेवाही उपलब्ध होणार आहेत.
राज्यभरात शहरी आणि ग्रामीण भागात रेशन दुकानांचे मोठे जाळे आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेंतर्गत गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना गहू, तांदूळ अल्प दरात वितरित करण्यात येतो. परंतु, रेशन दुकानदारांना सरकारी योजनेंतर्गत धान्य विक्रीतून मिळणारे कमिशन अत्यल्प आहे. हे कमिशन वाढविण्याची मागणी दुकानदारांची आहे.
कुटुंबाची उपजीविका भागविताना तारेवरची कसरत करावी लागते. ही बाब लक्षात घेत रेशन दुकानदारांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ‘सीएससी इ-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लि.’ या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.
या करारामुळे नागरिकांना रेशन दुकानांमधून विविध सेवा मिळणार आहेत. रेशन दुकानांचे काम मोजकेच दिवस असते. त्यामुळे विविध सुविधा या दुकानांच्या माध्यमातून पुरविण्याचा सरकारचा मानस आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेतंर्गत नागरिकांना सरकारी सेवा इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
या सेवा मिळणार
बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे, विमान तिकीट बुकिंग, एलपीजी सिलिंडर बुकिंग, सर्व प्रकारचे बिल्स (उदा. वीज बिल, फोन बिल, पाणी बिल), हेल्थ केअर सर्व्हिसेस, मोबाईल-डीटीएच रिचार्ज, आयटी रिटर्न, शेती विषयक सर्व सेवा, पासपोर्ट अर्ज, पॅनकार्ड, आधार कार्ड, विमा, फास्टॅग, सिबिल, डिजी पे, इ-वाहन-सारथी, कौशल्य विकास योजना, इ-स्टॅम्प आदी सुविधा.