उष्णतेचा कहर! यंदा कडक उन्हाळा, तब्येत सांभाळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । यंदाचा उन्हाळा मार्चमध्येच अधिक कडक असल्याचे संकेत देत आहे. वाढत्या उष्म्याबरोबर उन्हाळ्यातील आजार डोके वर काढतात. अशावेळी आहार, व्यायाम आणि काही साध्या गोष्टींचे आवर्जून पालन करावे लागते. अन्यथा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला चक्कर, डोळ्यासमोर अंधारी येण्यासह उन्हाचा ताप, डोळ्यांची आग, मूत्राघात यांसारख्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

तापमान ४० अंशांपर्यंत

नाशिक शहरात मार्चच्या मध्यावरच तापमान ३९.८ तसेच ३९.७ टक्क्यांपर्यंत गेले आहे. म्हणजेच नाशिक शहरातील तापमान ४० अंशानजीक पोहोचले आहे, तर मालेगावसारख्या शहरात तापमान ४० अंशांवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे यंदा नाशिक शहरातही एप्रिल-मे महिन्यात पारा ४३-४४ पर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय काळजी घ्याल?

अंगात सैलसर आणि फिकट रंगाचे कॉटनचे कपडे घालावे. डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडावे. उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये, दिवसभरात जास्तीत जास्त द्रवपदार्थ सेवन करावेत, उन्हात बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा, फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध फळांचे रस, काकडीचे प्रमाण वाढवावे.

भरपूर पाणी प्या

प्रत्येक नागरिकाने दररोजच्या पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. लिंबू-सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हे, ताक असे पाण्याचे प्रमाण अधिकाधिक असणारे द्रव पदार्थ घ्यावेत.

उष्माघात टाळण्यासाठी

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने व्यक्तीला ग्लानी तसेच चक्कर येते. डोळ्यासमोर अंधारी येते. अशावेळी पेशंटला थंड वातावरणात शांत झोपवावं. शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावं. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या पेशंटला जास्तीत जास्त द्रव आहार द्यावा. अशा पेशंट्सनी कडक उन्हाच्या वेळी घरातून बाहेर पडू नये. तसेच उष्माघात होत असलेल्या पेशंटला घरातदेखील एकटे सोडू नये.

..असा घ्या आहार

पचायला हलका व पाण्याचा घटक अधिक असलेला आहार घ्यावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचे सेवन वाढवावे. थंड तुपाचाही आहारात समावेश करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *