![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ मार्च । गेल्या पंधरवड्यापासून मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून मागणीप्रमाणे तब्बल 24 हजार ते 24 हजार 500 मेगावॅट विजेचा सुरळीत व विनाव्यत्यय वीजपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्याने ही मागणी यापुढे 25 हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत मागणीच्या तुलनेत पुरवठा करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यात भारनियमन अटळ आहे.
घरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सर्वच ग्राहकांनी मागणी व उपलब्धता यात समतोल राखण्यासाठी विशेषतः सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्याच्या इतिहासात प्रथमच विजेच्या मागणीने तब्बल 28 हजार मेगावॅटचा उंबरठा ओलांडला आहे. यामध्ये महावितरणच्या कार्यक्षेत्रात विजेच्या मागणीने गेल्या पंधरवड्यापासून सर्व उच्चांकांचे विक्रम मोडीत काढले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत विजेची कमाल मागणी 20 हजार 800 मेगावॅटवर गेली होती. मात्र, ही मागणी यंदा तब्बल 3,600 मेगावॅटने वाढली आहे व अधिक वाढण्याची शक्यता आहे. आजवरच्या सर्वाधिक मागणीनुसार, महावितरणने गुरुवारी (दि. 24) मुंबई वगळता उर्वरित राज्यभरात महाविक्रमी 24 हजार 400 मेगावॅट विजेचा सुरळीत पुरवठा केला. त्यानंतर शुक्रवारी (दि. 25) 24 हजार 65 मेगावॅट विजेचा पुरवठा केला.
सद्यस्थितीत कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक प्रकल्पांमधून प्राप्त होणार्या विजेमध्ये 2,000 ते 3,000 मेगावॅटपर्यंत घट झाली आहे.याउलट विजेच्या मागणीत मात्र ऐतिहासिक वाढ झालेली आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणीमध्ये ताळमेळ साधणे महावितरणसाठी जिकिरीचे झाले आहे.