महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ मार्च । मंगळवारपासून पुढील चार दिवस राज्यावर उष्णतेच्या लाटेचे सावट आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भातील काही शहरांचे तापमान ४३ ते ४४ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तापमान वाढत असल्याने सूर्याचा यूव्ही इंडेक्स (अतिनील किरणे) ११ या सर्वाधिक जाेखमीच्या पातळीवर असेल. त्यामुळे पुढील चार दिवस सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान थेट सूर्यप्रकाशात जाणे धोक्याचे ठरणार आहे.
राजस्थान, गुजरातसह वायव्येकडून येणारे शुष्क उष्ण वारे राज्यात धडकले आहेत. या वाऱ्यांचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यावर होणार आहे. या आठवड्यात राज्यात तापमान चाळिशी पार गेले असून येत्या एक एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट तीव्र होणार आहे. या लाटेचा परिणाम मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रावरदेखील होणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मार्च महिन्यात दुसऱ्यांदा राज्यात उष्णतेची लाट आली असून तापमान पुन्हा एकदा ४३ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात दुसऱ्यांदा धडकली लाट
या वर्षी मार्च महिन्यात १७ ते १९ मार्चदरम्यान विदर्भ, काेकणात उष्णतेची लाट धडकली होती. २९ मार्च ते १ एप्रिलदरम्यान दुसरी उष्णतेची लाट येणार आहे. या लाटेचा सर्वाधिक प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यात जाणवेल. विदर्भात २८ मार्च रोजी अकाेला शहराचे तापमान सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सियस होते. पुढील चार दिवसांत ते ४४ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भावर सर्वाधिक प्रभाव २९ मार्च ते १ एप्रिलदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट असेल. लगतचा प्रदेश असल्याने या लाटेचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रावरदेखील जाणवेल. वायव्येकडील राज्याकडून वाहत येणाऱ्या गरम हवेमुळे या लाटेची तीव्रता वाढेल. दरम्यान, या लाटेनंतरही तापमानात वाढ होणार आहे. – डाॅ. अनुपम कश्यपी, भारतीय हवामान खाते, पुणे.
१८ ते २० एप्रिलदरम्यान ढगाळ वातावरण असल्यास यूव्ही इंडेक्स ३ च्या मध्यम पातळीवर राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज.
अतिनील किरणांमुळे उष्माघात
२८ मार्च रोजी राज्यात मुंबई वगळता बहुतांश शहरांचा सरासरी यूव्ही इंडेक्स (सूर्याची अतिनील किरणे) हा ९ ते १० या उच्च पातळीवर होता. पुढील चार दिवसांत तापमान वाढणार असल्याने यूव्ही इंडेक्स ११ (अत्युच्च) धोकादायक पातळीवर राहण्याची भीती आहे. यूव्ही इंडेक्सची ही श्रेणी मानवी शरीरासाठी अतिशय धोकादायक असून अतिनील किरणे थेट शरिरावर पडल्यास त्वचा जळणे (सनबर्न), डाेळ्यांचे विकार, माेतीबिंदू, त्वचेचा कर्करोग, उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विषुववृत्ताच्या जवळ असल्याने महाराष्ट्रात यूव्ही इंडेक्स अधिक आहे.
सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान अतिनील किरणे अतितीव्र असतात.
दुपारी ४ नंतर तीव्रता कमी होते. यूव्ही इंडेक्स ३ ते ५ दरम्यान मध्यम, तर ६ ते ७ दरम्यान जास्त असतो.
८ ते १० दरम्यानची पातळी धोकादायक, तर ११ ते १२ दरम्यानचा इंडेक्स मानवी शरीरासाठी अतिजाेखमीचा म्हणून मानला जातो.
महाराष्ट्रात २९ मार्च ते १३ एप्रिलपर्यंत इंडेक्स ११ च्या पातळीवर, १४ ते १७ एप्रिलदरम्यान १२ च्या पातळीवर असेल.