IPL 2022: गुजरातविरुद्ध वादळी खेळी करणारा Ayush Badoni आहे तरी कोण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ मार्च । आयपीएलमध्ये (IPL 2022) पहिल्यांदाच खेळत असलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) यांच्यातला सामना रोमांचक झाला, अखेर गुजरातने दोन बॉल शिल्लक असताना लखनऊवर थरारक विजय मिळवला. मात्र, क्रिकेट जगतात या विजयासह विरोधी टीम लखनऊच्या एका खेळाडूची चर्चा अधिक रंगली आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामात पदार्पण करणाऱ्या लखनऊच्या 22 वर्षीय आयुष बदोनीची (Ayush Badoni) बॅट चांगलीच तळपली. त्याने 41 चेंडूत 54 धावा ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 4 चौकारही ठोकले. या अर्धशतकासह त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आयुष बदोनी (Ayush Badoni) आयपीएलमध्ये पदार्पण करत सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना 50 हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, त्याने 15 वे षटक टाकण्यास आलेल्या गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या पहिल्या 3 चेंडूंवर अनुक्रमे षटकार आणि 2 चौकार ठोकले. त्याच्या या कामगिरीची चर्चा सर्वत्र अधिक रंगली आहे.

आयपीएल पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात विस्फोटक खेळी करणारा आयुष बदोनी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो. तो एक अष्टपैलू खेळाडू असून खालच्या फळीत उपयुक्त खेळी करण्याच पटाईत आहे.

त्याने भारतीय संघाच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळताना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 185 धावांची खेळी करत सर्वांकडून ककौतुक करुन घेतले होते.

त्याने 4 दिवसीय सामन्यात 9.3षटके गोलंदाजी करताना 24 धावा देत 4 विकेट्सही चटकावल्या होत्या. यादरम्यान त्याने 2 निर्धाव षटके टाकल्या होत्या.

बदोनीने 2018 मध्ये 19 वर्षांखालील आशिया चषकात शानदार कामगिरी केली होती. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना 28 चेंडूत ५२ धावांची खेळी केली होती. यानंतर जानेवारी 2021मध्ये त्याने आपले टी20 पदार्पण केले होते. तसेच, आयुष देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून 5 सामनेही खेळला आहे.

देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या बदोनीला 20 लाखांच्या मूळ किंमतीत विकत घेतले होते. अशात बदोनीने पहिल्याच सामन्यात शानदार अर्धशतक ठोकत हे स्पष्ट केले आहे की, त्याला पुढच्या लिलावात 20 लाखांपेक्षा नक्कीच जास्त रुपये मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *