राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे ; आरोग्यमंत्री राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन :मुंबई : राज्यात आज (ता.०३) कोरोनाबाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ५४ रुग्ण मुंबई येथील असून ९ जण अहमदनगरचे, ११ पुणे येथील आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. २ रुग्ण औरंगाबादचे तर प्रत्येकी १ रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज राज्यात ४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी एका ६१ वर्षिय पुरुषाचा मृत्यू झाला असून हा रुग्ण दिनांक ३१ मार्च रोजी नायर रुग्णालयात भरती झाला. त्याला रक्ताचा कर्करोग होता. त्याचा काल (ता.०२) दुपारी मृत्यू झाला. दुसऱ्या रुग्णाचे वय ५८ वर्षे होते. मूत्रपिंडाचा जुनाट आजार असणारा हा रुग्ण २९ तारखेला भरती झाला होता. त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. काल संध्याकाळी त्याचा सायन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तिसरा रुग्ण हा ५८ वर्षाचा पुरुष होता. हा रुग्ण २६ मार्च रोजी एका खाजगी रुग्णालयात भरती झाला. त्याचा काल (ता.०२) दुपारी मृत्यू झाला. चौथा रुग्ण हा ६३ वर्षे वयाचा पुरुष असून या रुग्णाचा मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात काल (ता.०२) संध्याकाळी झाला. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता महाराष्ट्रात २० झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मुंबई : २३५
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) : ६१
सांगली : २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा : ४५
नागपूर : १६
यवतमाळ : ४
नगर : १७
बुलढाणा : ५
सातारा, औरंगाबाद प्रत्येकी : ३
कोल्हापूर : २
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद प्रत्येकी : १
इतर राज्य – गुजरात : १

एकूण ४२३ त्यापैकी ४२ जणांना घरी सोडले तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकूण ६४८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० हजार ८७३ नमुन्यांपैकी १० हजार २८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत तर, ४२३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४२ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार२४४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २१३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *