महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० मार्च । कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Algorithms) सातत्याने लक्ष ठेवून असतात. सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याचं निदर्शनास आल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर या यंत्रणा कायदेशीर कारवाई करतात, अशी माहिती आज केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली.
सोशल मीडियावरून हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भडकाऊ पोस्ट पसरवल्या जातात. त्यावरून राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला. फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील हिंसेला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारची काय रणनिती आहे? असा सवाल त्यांनी विचारला. आतापर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींबदद्ल सरकारने काही कारवाई केली की नाही? याची माहिती त्यांनी मागितली. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी उत्तर दिलं.
सरकारने आयटी (मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम २०२१ अधिसूचित केले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार प्रयत्न करतेय. सोशल मीडियाचा गैरवापर होतोय का? किंवा त्यावरून भडकावू पोस्ट पसरवल्या जातात का? यावर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचं लक्ष असतं. आम्हाला अशा पोस्ट दिसल्यानंतर किंवा कोणी तक्रार केल्यानंतर त्वरीत कारवाई केली जाते, असं अजय मिश्रा टेनी यांनी सांगितलं.
सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बुल्ली बाई आणि सुल्ली डिल्स नावाच्या अॅपचा वापर करून एका विशिष्ट समाजातील महिलांची बोली लावली जात होती. त्याला ट्विटरवरून शेअर केले जात होते. प्रतिष्ठीत महिलांची बदनामी केली होती. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.