Pune Helmet Rule:पुण्यात तोंडावरचा मास्क गेला आणि डोक्यावर हेल्मेट आलं, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मार्च । राज्य सरकारनं महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला दिलासा देणार निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. राज्य सरकारनं मास्कचा वापर ऐच्छिक केला आहे. पुणे (Pune) जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात हेल्मेट (Helmet) सक्तीसंदर्भातील आदेश जारी केला आहे. त्यामुळं पुणेकरांची अवस्था मास्क तोडांवरुन गेला आणि डोक्यावर हेल्मेट आलं अशी झाली आहे. पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणा, यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या दुचाकीचा वापर करणान्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय म्हटलंय?
वाहन अपघातात दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे 80 टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. कार चालकांच्या तुलनेने दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट जास्त आहे. जितके दुचाकी वाहन चालक रस्ते अपघातात दगावतात, त्यापैकी सुमारे 62 टक्के व्यक्तींना डोक्याला इजा झाल्यामुळे मृत्यू ओढवतो.

मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 नुसार तसेच मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्याने वाढते.

शासकीय कर्मचाऱ्यांना बंधनकारक
मोटार वाहन कायद्यानुसार 4 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. सबब याद्वारे पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणा, यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या दुचाकीचा वापर करणान्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सुचित करण्यात येते की, शासकीय नियमांचे पालन करणे हे शासकीय अधिकारी यांचे आद्यकर्तव्य आहे. जनतेस मार्गदर्शक ठरावे यादृष्टीने तसेच स्वतःच्या व सहप्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयात येताना जाताना अथवा कोणत्याही अन्य कामासाठी दुचाकी वाहन वापरतांना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. दुचाकी वापरतांना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी/कर्मचारी/नागरीक हे मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 129 चे उल्लंघन केल्यास त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल असे आदेश आज दिनांक 29.03.2022 रोजी देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *