Video : माही जुन्या अवतारात , हा सिक्स पाहून सगळेच हैराण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ एप्रिल । आयपीएल 2022 मध्ये गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात चाहत्यांना महेंद्रसिंह धोनीची तीच जुनी शैली पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्जकडून फलंदाजीसाठी उतरलेल्या महेंद्रसिंह धोनीने येताच असा षटकार मारला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महेंद्रसिंह धोनीने सिक्स मारुन सगळ्यांचे मन जिंकले.

या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने मैदानात येताच आपल्या बॅटची ताकद दाखवत आवेश खानच्या ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर एक शानदार षटकार ठोकला, जे पाहून सर्व चाहत्यांनी मैदानात धोनीच्या नावाचा जयघोष केला. धोनीने या षटकाराने केवळ आपल्या डावाची सुरुवातच केली नाही तर इतिहासही रचला. या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये कधीही षटकार मारून डावाची सुरुवात केली नव्हती, परंतु या सामन्यात त्याने सिक्सने डावाची सुरुवात केली.

या सामन्यात धोनीने सहा चेंडूत दोन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील शेवटच्या चेंडूवर एमएस धोनी क्रीजवर होता, त्यानंतर त्याने चौकार मारून डाव संपवला. धोनीच्या या कॅमिओमुळे चेन्नई सुपर किंग्जचा संघ 210 धावा करू शकला. महेंद्रसिंह धोनीने या खेळीसह टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या आहेत. एमएस धोनीने आतापर्यंत एकूण 349 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 7001 धावा आहेत. एमएस धोनीने सरासरी ३८.६८ ने या धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *