महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 एप्रिल । राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु झाले आहे, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. त्याचवेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला इशाराही दिला आहे. ‘लाऊडस्पीकर काढा नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू’, असे राज म्हणाले.
मशिदीतील लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. याबाबत देशातील अनेक शहरांतून आवाज उठवण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. मशिदींच्या लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढी पाडव्याच्या दिवशीच्या भाषणात मशिदींमधील लाऊडस्पीकर बंद करण्याची मागणी केली.
शिवाजी पार्कवरून सरकारला खडे बोल
मुंबईतील शिवाजी पार्कमधील सभेत राज ठाकरे म्हणाले, ‘मशिदींमधले लाऊडस्पीकर इतके जोरात का वाजवले जातात? हे थांबवले नाही तर मशिदीबाहेर स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवली जाईल. ते म्हणाले, मी प्रार्थना किंवा कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नाही. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांवर नाराजी
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आणि त्यांच्यावर वेळोवेळी जातीचा मुद्दा उपस्थित करून समाजात फूट पाडल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु झाले आहे, असे ते म्हणाले. राज्यात एक नंबरचा पक्षा भाजप आणि दोन नंबरचा पक्ष शिवसेना पण तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राज्य करत आहे. तो सगळ्यांना नाचवतोय, अशी टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ज्यांचा पक्ष शिवसेना 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी फारकत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणत होते की, देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. उद्धव ठाकरे मंचावर उपस्थित होते पण त्यांनी कधीही जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला नाही.
त्यांच्या मदतीशिवाय (2019च्या निवडणुकीनंतर) भाजप सरकार स्थापन करू शकत नाही, हे लक्षात आल्यावरच उद्धव यांनी हा मुद्दा उचलला. सरकारमधील तिन्ही पक्षांनी (शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस) जनतेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.