शरद पवारांकडून राज ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक आरोपाला सडेतोड प्रत्युत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 एप्रिल । पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरील आयोजित सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला पवारांनीही आज कोल्हापुरात बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. “राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात आणि मग एखादं व्याख्यान देतात. परत व्याख्यान दिल्यावर ३-४ महिने कुठे जातात माहिती नाही”, अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. तसंच उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक केलं, पण उत्तर प्रदेशात आपण कोणता विकास पाहिला?, असा सवालही पवारांनी राज यांना विचारला.

हिंदुत्वाची शाल पांघरल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पाडवा मेळाव्यात मनसैनिकांना संबोधित केलं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी शिवसेना राष्ट्रवादीवर कडाडून हल्ला चढविला. शरद पवार यांच्यावर ठाकरी तोफ डागली. पण या संपूर्ण भाषणात त्यांनी भाजपविरोधात एक अवाक्षर काढलं नाही. शरद पवारांना तर जातीयवादी म्हणत त्यांना अशाच प्रकारचं राजकारण अपेक्षित असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरेंच्या भाषणानंतर आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार यांनी कोल्हापुरात बोलताना राज ठाकरेंच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला.

शरद पवार म्हणाले, “राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नसतं हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे. २०१९ ला मोदीविरोधी बोलणारे राज ठाकरे काल उत्तर प्रदेशचं कौतुक करत होते. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये कोणता विकास दिसला, कोणजाणे… राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात आणि मग एखादं व्याख्यान देतात. परत व्याख्यान दिल्यावर ३-४ महिने कुठे जातात माहिती नाही”

“उत्तर प्रदेशात योगींच्या काळात शेतकऱ्यांवर गाडी घालण्यात आली. त्यात अनेक शेतकरी दगावले. योगींच्या पाच वर्षांच्या राजवटीत जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण केली केली. लखीमपूर घटना असो वा हाथरसची घटना, योगींच्या राजवटीत काय झालं, हे देशाने पाहिलंय. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात अशा घटना पाहायला मिळणार नाहीत, असंही पवार म्हणाले.

उत्तर प्रदेश विधानसभेचा निकाल लागला, तो निकाल भाजपच्या बाजूने का लागला, त्याची अनेक कारणं सांगता येतील, पण राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात विकास दिसला कुठे, हा माझा त्यांना प्रश्न” असल्याचं पवार म्हणाले.

“राज ठाकरे कधीच भूमिकेवर ठाम राहत नाही. त्यांनी आता आपला मोर्चा हिंदुत्वाच्या दिशेने वळवला आहे. अयोध्या दौऱ्याची घोषणा देखील केली आहे. त्यांच्यामध्ये गुणात्मक फरक जाणवतो आहे, त्यांच्यावर आता अधिक बोलू इच्छित नाही”, असं सरतेशेवटी पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *