महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 एप्रिल । मनसेचा गुढी पाडवा मेळाव्यात काल शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जातीवादाचे आरोप केले आहेत. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आज शिवसेनेकडूनही त्यांच्या या आरोपाला तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अक्कल दाढ उशिरा येते, असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. आज मुबंईत ते बोलत होते.
राज ठाकरेंनी काल शिवजी पार्क येथे मेळाव्याला संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करून सरकार आणि मुस्लिमांवर निशाणा साधला होता. त्याला प्रतित्त्युर देताना राऊत म्हणाले, काल मुंबईत मेट्रोसह अनेक उद्घाटनं झाली. लोकार्पण झाली त्यावर बोला, भोंग्याचं काय करायचं त्यासाठी सरकार समर्थ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी मराठी भाषा भवनचं स्वागत करायला हव होत. त्याविषयी कुणी काही बोलेल नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार यांनी जातीयवाद पसरवला या राज ठाकरेंनी केलेल्या आरोपावर ते म्हणाले, आपणही शरद पवार यांच्या चरणाशी सल्लामसालत करण्यासाठी जात होता. कशाकरता आपण टोलेबाजी करायची. तुमच्या भाषणाला तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळतात, आणि त्या टाळ्यांनाही प्रायोजक असतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, काल शिवतीर्थावरचा भोंगा हा भाजपचा होता. यावरून काल सबंध महाराष्ट्राला दिसले की, अक्कल दाढ उशिरा येते. अशा टीकेनं आहे तेही गमावून बसाला, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना दिला आहे. कारण भाजपा स्वत:ची मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढत असल्याचेही सांगत राऊतांनी भाजपावरही निशाणा साधला.