महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 एप्रिल । डिझेलचे दर झपाट्याने वाढू लागले आहेत. २० मार्च २०२२ पासून सुरू असलेली ही वाढ थांबायलाच तयार नाही. मुंबईतील मालवाहतूक अडचणीत सापडली. अनेक मालवाहतूकदार काही काळ व्यवसाय बंद ठेवण्याच्या मन:स्थितीत आले आहेत. दरवाढ कायम राहिल्यास वाहनांचे सुटे भाग व जीवनाश्यक वस्तूंच्या किमती पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देशातील पेट्रोलियम वितरण कंपन्यांनी पेट्रोल व डिझेल या वाहतूक इंधनांच्या दरांमध्ये वाढ केली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव १२०-१३० डॉलर प्रतिबॅरल पोहोचल्यानंतर ही दरवाढ अपेक्षितच होती. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप मालवाहतूकदार संघटनांनी केला. दहा दिवसांत नऊ वेळा दरवाढ झाली आहे. शुक्रवारी डिझेलचा दर प्रतिलीटर १०१ रुपये नोंदविण्यात आला. ही वाढ अशीच सुरू राहिल्यास मालवाहतूक महागणार आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाला बसणार आहे.
विमा महागला
अनेक विमा कंपन्यांनीही प्रीमियममध्ये वाढ केली. डिझेलदर वाढल्याने भाजीपाला, किराणा, दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे दर वाढले. डिझेलच्या वाढत्या दरांबाबत ट्रान्स्पोर्टर्सनी चिंता व्यक्ती केली आहे. व्यवसाय अडचणीत आला.
वर्षभरात डिझेल १३ रुपयांनी महागले
वर्षभरात डिझेल १३ रुपयांनी महागले. वाहतूकदारांचे व कारखान्यांचे इतर माल वाहतुकीचे वार्षिक कंत्राट केले जाते. त्यासाठी काही अटी व शर्तीही असतात. नियमांचे पालन करून गाड्या चालवायच्या कशा, असा प्रश्न आहे.