महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । सातारा शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वाढू लागला आहे. बुधवारी सातारा शहराचा पारा 38 अंशावर पोहचल्याने वातावरणात चांगलाच उकाडा जाणवत होता. वाढत्या तापमानात उकाड्याने अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
थंड हवेचे ठिकाण व मिनी काश्मीर अशी ओळख असलेले महाबळेश्वरचा पारा 33 अंशावर पोहचल्याने तापले आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणाचा नूरच पालटला आहे. कधी कडक उन तर कधी ढगाळ हवामान अशा विचित्र वातावरणाचा सामना सातारकरांना करावा लागत आहे. मागील चार दिवसांपासून तापमानाचा पारा चढलेलाच आहे. बुधवारी दिवसभर सातारा शहरासह जिल्ह्याचा पारा 38 अंशावर गेला. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत होती. दिवसभर कडक उन्ह आणि उकाडा यामुळे अंगाची लाही लाही होत होती. हवेत गारवा येण्यासाठी नागरिकांनी अवकाळी पावसाची आस धरली आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांबरोबर नागरिकांची वर्दळ कमी झाली होती. अधून मधून ढगाळ हवामानाचा सामना करावा लागल्याने अस्वस्थता आणखी वाढत आहे. मागील आठवड्यामध्ये राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला होता. तो अंदाज चुकला असला तरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मात्र वाढत्या उष्म्याचा तडाखा सातारकरांना बसला आहे. आता कुठे उन्हाळ्याला सुरुवात झाली असून पुढील काळात उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात उन्हाच्या झळा बसणार आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचे कमाल तापमान 33 अशांवर होते. वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी नागरिकांनी आपला मोर्चा थंडावा देणार्या पदार्थांकडे वळवला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील बाजारपेठ व रस्त्यावर टोप्या, गॉगल्स तसेच स्टोल, स्कार्प आणि सनकोट खरेदीला नागरिक प्राधान्य देत आहेत. दररोजच्या कपड्यांमध्येही सुती व कॉटनच्या कपड्यांचा वापर वाढला आहे. भर उन्हात घशाला थंडावा देण्यासाठी कोल्ड्रींक्स हाऊस, शितपेये, आईस्क्रीम पार्लर, रसवंतीगृहे, सरबत दुकानात नागरिकांची गर्दी होत आहे. फळांच्या रसाबरोबरच ताक, लस्सी, यासारख्या थंड पेयांना मागणी वाढली आहे. तसेच फळांनाही मागणी वाढली असून सेंद्रिय व रसदार फळांसाठी नागरिक आग्रही रहात आहेत.