पुणेकर महिलांसाठी बातमी; आता दर महिन्याच्या ‘या’ तारखेला करा मोफत प्रवास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । येत्या आठ एप्रिलपासून तेजस्विनी बसमध्ये महिला प्रवाशांना मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने दर महिन्याच्या आठ तारखेला महिलांना ‘तेजस्विनी’ या बसमधून ‘मोफत प्रवासा’ची योजना सुरू केली होती. करोनाकाळात ही योजना गुंडाळण्यात आली होती. मात्र, आता ही योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

पीएमपीच्या तत्कालीन अध्यक्ष नयना गुंडे यांनी तेजस्विनी बसमध्ये महिला प्रवाशांना मोफत प्रवासाची योजना लागू केली होती. त्यानुसार दर महिन्याच्या आठ तारखेला महिलांना तेजस्विनी बसमध्ये तिकीट आकारले जात नव्हते. मात्र, २५ मार्च २०२०पासून लॉकडाउन लावण्यात आला. त्यानंतर ही योजना बंदच झाली. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. परिस्थिती सुरळीत झाली. त्यानंतर या वर्षी महिला दिनापासून पुन्हा ही योजना लागू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होती. मात्र, पीएमपी प्रशासनाला त्याचा विसर पडला. त्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध करून या विषयाला वाचा फोडली होती. महिलांसाठी मोफत प्रवास योजना तातडीने सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष मृणालिनी मदन वाणी यांनी पीएमपीकडे मागणी केली होती. त्यानुसार आता दर महिन्याच्या आठ तारखेला महिला प्रवाशांना तेजस्विनी बसमध्ये मोफत प्रवासाची संधी दिली जाणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *