आज शेतकऱ्यांना घेऊन गाठणार ईडीचे कार्यालय, जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी करणार तक्रार ; किरीट सोमय्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । INS विक्रांत प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्यावर अनेक आरोप केले. मात्र, आपल्याविरोधात कितीही आरोप केले तरी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढतच राहू, असे आज किरीट सोमय्या यांनी सांगितले. तसेच आज दुपारी आपण शेतकऱ्यांना सोबत घेऊन ईडी कार्यालयात जाणार असून जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी कागदपत्रांसह ईडी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच, जरंडेश्वर सहकारी कारखाना अजित पवारांनी बेकायदा बळकावला असून तो शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी आपण ईडीकडे करणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

जरंडेश्वर कारखाना अजित पवारांनी बेकायदा ताब्यात घेतला!
साताऱ्यातील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना अजित पवारांनी बेकायदा ताब्यात घेतला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी घरातील महिला व इतर सदस्यांचा वापर केला. त्यामाध्यमातून 1200 शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे हा कारखाना अजित पवारांच्या ताब्यातून परत घेऊन तो शेतकऱ्यांना सोपवण्यात यावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. यासंदर्भात अधिक पुरावे देण्यासाठी आज ईडी कार्यालयात जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे.

2010मध्ये झाली होती जरंडेश्वर कारखान्याची विक्री
जरांडेश्वर सहकारी साखर कारखा 2010 मध्ये मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस या कंपनीला विकण्यात आला होता. मात्र, कंपनीच्या मुळ किंमतीपेक्षा खूप कमी किंमतीत हा कारखाना विकण्यात आला. या व्यवहारामध्ये कायदेशीर बाबींचे पालनही करण्यात आले नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस या कंपनीशी अजित पवारांच्या कुटुंबांचा संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी यापुर्वीही ईडीकडेही तक्रार दिली आहे.

संजय राऊत एकही पुरावा देऊ शकलेले नाही!
INS विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी जमा केलेले पैसे पीएमसी बँकेच्या माध्यमातून पांढरे केले. यासाठी किरीट सोमय्यांनी 700 बॉक्समध्ये हे पैसे बँकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले होते. आपल्याकडे यासंदर्भात फोटो आहेत, असा दावा आज संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर संजय राऊत हे फक्त आरोप करतात. मात्र, आतापर्यंत या आरोपांसंदर्भात ते एकही पुरावा देऊ शकलेले नाही. त्यांनी जे नवीन आरोप केले, त्याचे पुरावे जनतेसमोर आणावे, असे आव्हान आज किरीट सोमय्या यांनी दिले. तसेच, आपल्याविरोधात कितीही गुन्हे दाखल केले तरी महाविकास आघाडीचे घोटाळे बाहेर काढणे आपण थांबवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *