महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी नकार दिला. विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश वि. चं. बर्डे यांनी देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. ही कोठडी मुंबईपुरती मर्यादित असून देशमुख यांना दिल्लीत चौकशीसाठी न्यायचे असेल तर जे. जे. रुग्णालयाची परवानगी आवश्यक असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
खंडणीप्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे व संजीव पालांडे यांना सीबीआयने सोमवारी अटक केली; परंतू देशमुख जे जे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही. देशमुख यांना मंगळवारी रात्री डिस्चार्ज मिळाल्यानंतर सीबीआयने आज त्यांचा ताबा मिळावा यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यावर आज न्यायाधिश वि. चं. बर्डे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. अनिल देशमुख यांच्यावतीने ऍड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडली.