राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर पुढची दिशा काय?; बाळा नांदगावकर म्हणतात…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा ठाण्यातील सभेला परवानगी नाकारल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. आज मनसे नेते बाळा नांदगावकर आणि जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेसाठी स्थळ निश्चित होणार होते. अद्यापही पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिली नाहीये. मात्र, मनसे नेते बाळा नांदगावर यांनी सभा ठाण्यातच होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

९ एप्रिल रोजी ठाण्यामध्ये राज ठाकरे सभा घेणार आहेत. ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील मूस रोड येथे सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र या रस्त्यावरच्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी मनसेला दुसरा उपाय म्हणून बंदिस्त सभागृह किंवा खुले मैदानाठिकाणी सभा घेण्याची सूचना दिली होती. याबाबत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली आहेत. तसेच ठाण्यात सभेसाठी अनेक जागांची पाहणीही केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरेंची सभा ठाण्यातच होणार, असं आव्हान विरोधकांना केलं आहे.

‘सकाळी पोलिस आयुक्तांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत कमिशनर साहेबांनी ठाण्यात सभा घ्यायची तर कुठे घ्यायची तर यासाठी त्यांच्या काही सहकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी पाठवलं आहे. गडकरी चौकाकडे सभेसाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर आणखीही काही जागा पाहिल्या आहेत. मला असं वाटतं त्याजागांपैकी एक जागेसाठी पोलिस परवानगी देतील. याची खात्री आहे. पण ठाण्यातच सभा होणार,’ असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

 

‘साहेबांची सभा किती मोठी होते हे सर्वांनाच माहिती आहे आणि ठाण्यातील मैदानं खूप छोटे आहेत. ठाणेकरांसाठी मोठ्या मैदानाची अत्यंत आवश्यकता आहे. दुर्दैवाने इथे मोठे मैदानं नाहीत. त्यामुळं आज जाऊन जागेची पाहणी केल्यानंतर निश्चितपणे निर्णय घेतील, आयुक्त आणि त्यांची सहकारी सकारात्मक निर्णय घेतील. याची खात्री आहे,’ असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

‘ठाणे हा राज ठाकरेंच्या आवडीचा विषय आणि शहर आहे. ठाण्यातील मुद्द्यावरही राज ठाकरे विषय मांडू शकतात. शिवाजी पार्कपेक्षा आक्रमकपणे इथे मुद्दे मांडतील,’ असे संकेतही बाळा नांदगावकर यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *