महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या सिल्व्हर ओक येथील घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ११० एसटी कर्मचाऱ्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे, तर या हल्ल्यासाठी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली त्यांचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सोमवार, ११ एप्रिल रोजी किल्ला कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे.
पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि सदावर्ते यांनी शुक्रवारी रात्री गावदेवी पोलिसांनी अटक केली. शनिवारी किल्ला कोर्टात त्यांना हजर करण्यात आले असता सदावर्ते, कर्मचारी, पोलिस अशा तीन पक्षांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. या हल्ल्याचा घटनाक्रम व त्यामागे सदावर्ते यांची चिथावणी कारणीभूत आहे का? याची तपासणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांची १४ दिवसांची कोठडी मागितली. हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांचे मोबाइल पोलिसांनी पुढील तपासासाठी जप्त केले असून त्यांची पोलिस कोठडी न मागितल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यांच्या जामिनाचा अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळून त्यांना सत्र न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले.
सरकारी वकिलांनी असा केला कोर्टात युक्तिवाद
हल्ल्यामागील सूत्रधाराचा तपास करण्यासाठी सदावर्ते यांची १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी
सीसीटीव्हीमधील पुराव्यांनुसार हा हल्ला पूर्वनियोजित
कर्मचारी व सदावर्ते यांच्यातील संभाषणाचा तपास बाकी
सदावर्ते यांची आधीची भाषणे व बाइट्स तपासणार
अॅड. सदावर्ते यांच्या वकिलांचा युक्तिवाद
आम्ही न्यायालयातच होतो, घटनास्थळी उपस्थित नव्हतो, असा दावा वकिलांनी या वेळी केला
घटनेनंतरही पळून गेलो नाही, मी कुटुंबासह घरीच होतो
मधुमेह व रक्तदाब यामुळे आपल्याला जामीन मिळावा
मुंबई पोलिसांनी आपल्याला मारहाणही केली.