भोंग्यांवरील कारवाईवर मनसेचा सवाल ; शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० एप्रिल । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता शिवसेना पक्षाचं मुख्यालय असलेल्या ‘शिवसेना भवना’बाहेर लाऊडस्पीकर लावले आहेत. या लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात आली आहे. आज रामनवमीचं औचित्य साधत मनसेनं शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आता मनसेचे हे लाऊडस्पीकर जप्त करत मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या या कारवाईवर मनसेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

याविषयी बोलताना मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी म्हटलंय की, शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का? आज रामनवमी आहे. त्यानिमित्त सेना भवनाबाहेर जर हनुमान चालीसाचे पठाण केले तर यात गैर काय आहे? शिवसेना भवन काय मस्जिद आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, शिवसेना भवन हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक पवित्र स्थान आहे. मग त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारला त्याची अडचण काय आहे? मस्जिदसमोर हनुमान चालीसा लावली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मग सेना भवन ही मस्जिद आहे का? ठाकरे सरकार हे तालिबानी आहे का? असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे.

मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवर लावल्या जाणाऱ्या भोंग्यांच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं होतं. मनसेवर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी येत्या १२ तारखेला ठाणे मध्ये मनसेची राजकीय उत्तर सभा पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *