महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० एप्रिल । शिर्डीतील तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. काकड आरतीनंतर साई प्रतिमा, विणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. साई समाधी मंदिरातून ही मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी साईसच्चरित्र ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले आणि उत्सवास सुरुवात झाली. उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
साईबाबांच्या संमतीने सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम एकतेच प्रतीक म्हणून शिर्डीतील रामनवमी उत्सवाला बघितले जाते. शिर्डीत रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. कोरोनाच्या काळात दोन वर्षे रामनवमी उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला होता. मात्र, आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्याने रामनवमी उत्सव मोठय़ा जल्लोषात साजरा होत आहे. शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. उत्सवाच्या निमित्ताने साईमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर, साई संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री रामगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते प्रथमच ध्वजारोहण करण्यात आले.
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी पोथी, उपाध्यक्ष ऍड. जगदीश सावंत व विश्वस्त ऍड. सुहास आहेर यांनी प्रतिमा व विश्वस्त अविनाश दंडवते हे विणा घेऊन सहभागी झाले होते. याप्रसंगी विश्वस्त सचिन गुजर, राहुल कनाल, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर विभागप्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिर्डी शहरात श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या विद्यमाने यंदा 111 वा श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे. उत्सवाचा पहिल्या दिवशी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ध्वजस्तंभांचे श्रीक्षेत्र सराला बेटाचे महंत प.पू. रामगिरी महाराजांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.