महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ एप्रिल । बालपणीच शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत, यासाठी आता दररोज शालेय परिपाठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिग्रंथाचे वाचन करण्यात येणार आहे.छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, बालभारतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाचे पुनर्मुद्रण केले आहे. राज्यातील सर्व शाळांच्या ग्रंथालयांना हे स्मृतिग्रंथ विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या ग्रंथातील १६ नामवंत इतिहासकारांचे व मान्यवरांचे लेख शाळेच्या दैनंदिन परिपाठातून विद्यार्थ्यांना क्रमशः वाचून दाखविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवा विचार, दृष्टी आत्मसात होईल, शिवाय जात-पात, धर्म-पंथ, प्रांत, भाषेची सगळी कुंपणे मोडून शौर्य, त्याग, पराक्रमाने लोकांचे राज्य, स्वराज्य निर्मितीचा इतिहास विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.
आदर्श भावी पिढी निर्माण करण्यासाठी शाळेत रुजविण्यात आलेले संस्कार विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरतात. आदर्श भावी पिढी निर्माण करणे आणि तिला सुसंस्कारित करण्याचे काम पालक आणि शाळेतून होते. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर शिस्त, संस्कार, हिंदवी स्वराज्य आणि धर्माचे पालन करण्याचे संस्कार केले. त्यामुळेच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे स्मृतिग्रंथातून मुलांमध्ये अध्यात्मासह संस्कार, धर्मशिक्षण, राष्ट्ररक्षणाचे बीज पेरले जाईल.