महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ एप्रिल । ‘विक्रांत वाचवा’ या मोहिमेच्या नावाखाली ‘क्राऊड फंडिंग’ करत भाजपच्या किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी निधी गोळा केला. राजभवनच्या नावे बँक खात नसल्याने हा निधी पक्षाला दिल्याचा दावा सोमय्या यांच्या वकिलांनी आज सत्र न्यायालयात केला. त्यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी, पैसे पक्षाला दिले म्हणता मग कुणाला दिले त्या नेत्याचे नाव सांगा, त्यांनी त्या पैशांचा वापर मग केला कुठे, असा जोरदार युक्तिवाद करत सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे बाप-बेटे जेलमध्ये जाणार हे निश्चित झाले आहे.
विक्रांत वाचवाच्या नावाखाली सोमय्या पितापुत्रांनी कोटय़वधी रुपयांचा निधी गोळा करत अपहार केल्याचा भांडाफोड शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. विक्रांतसाठी गोळा करण्यात येणारा निधी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र, असा कोणताही निधी त्यांनी राजभवनात जमा केलेला नसल्याचे माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरून उघड झाले आहे. ‘विक्रांत’च्या नावाखाली निधी गोळा करून 58 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस येताच माजी सैनिक बबन भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमय्या पितापुत्रांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या भीतीने सोमय्या पितापुत्र गायब झाले असून अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरू केली आहे.