सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ; उद्या हजर न राहिल्यास मोठी कारवाई होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ एप्रिल । आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी गोळा करण्यात आलेल्या निधी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन काल सत्र न्यायालयानं फेटाळला. त्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखा सोमय्या पिता-पुत्रांना नोटीस बजावणार आहे.

आर्थिक गुन्हे शाखा सोमय्या पिता-पुत्रांना नोटीस बजावेल. उद्या दोघे चौकशीसाठी हजर न राहिल्यास न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई सुरू होईल. सोमय्या पिता-पुत्रांविरोधात वॉरंट जारी केलं जाईल. दोघांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं तीन पथकं तयार केली आहेत. सोमय्या चौकशीसाठी हजर न राहिल्यास त्यांच्या शोधासाठी तीन पथकं रवाना होतील. त्यामुळे उद्या हजर न झाल्यास सोमय्यांच्या अडचणी वाढू शकतात.

गृह विभागाला ठावठिकाणा माहीत नाही
भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा ठावठिकाणा माहिती नाही. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे नेमके कुठे गेले, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती गृह विभागाकडे नाही.

केंद्राकडे विचारणा करू- वळसे पाटील
केंद्रानं सोमय्यांना सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे तुम्ही सुरक्षा दिलेली व्यक्ती कुठे आहे याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाला विचारणा करू, असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. दुसऱ्यांवर आरोप करणं सोपं असतं. मात्र स्वत:वर आरोप झाले की पळून जायचं हे काही शूरपणाचं लक्षण नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *