Electricity Bill : राज्यात वीज बिलासाठी आता प्रीपेड कार्ड येणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ एप्रिल । कोळसा टंचाईमुळे राज्यात लोडशेडिंगचे संकट वाढत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात प्रीपेड कार्डद्वारे वीज पुरवठा करण्याचे संकेत दिले आहेत. प्रीपेड कार्ड योजनेमुळे वीज चोरीचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. म्हणजेच काय जसं मोबाईलला रिचार्ज केल्यामुळे कॉलिंग सुरू होतं त्याचप्रमाणे कार्डला रिचार्ज केल्यानंतर गरजे इतकी वीज वापरता येणार आहे.

अजित पवार हे रविवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातल्या कोऱ्हाळे खुर्दमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पवार आले असता यावेळी त्यांनी विजेच्या वाढत्या संकटाबाबत चिंता व्यक्त केली. ‘राज्यात कोळशाच्या संकटामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. पर्यायाने लोडशेडिंग करावं लागत आहे. आम्ही काही कोळसा परदेशातून आयात करण्याचा प्रयत्न केला. पण आपले पावर प्लांट असे आहेत की त्यात परदेशी कोळसा १००% चालत नाहीत. आता उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तीन ते चार हजार मेगाव्हॉट विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून जास्त पैसे देऊन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या देशात विजेची टंचाई निर्माण झाली आहे.’

सध्या उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून वीज निर्मितीसाठी प्रयत्न केला जातो आहे. मात्र, लोकांनी वापरलेल्या विजेचं बिल भरणंही आवश्यक आहे. सध्या वीज चोरीचे प्रमाण वाढले असल्याने राज्य सरकार प्रीपेड कार्डचा पर्याय आणत आहे. जशी गरज असेल तसे कार्ड रिचार्ज करून विजेचा वापर करावा, असा पर्याय आणायचा विचार सरकार करत असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, ‘आता यापुढे आकडा बंद करावाच लागेल. आकड्यांमुळे सरकारची वाट लागली आहे. लोकांना चांगली सर्विस पाहिजे असेल तर मानसिकता बदलावी लागेल. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून विजेचा प्रश्न सोडवावा लागणार आहे, असंही पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *