आर्थिक बजेट कोलमडणार ; सर्वसामान्यांना मोठा झटका, महागाईचा दर प्रचंड वाढला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ एप्रिल । देशात एकीकडे धार्मिक मुद्द्यावरून तेढ निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे महागाईनं सर्वसामान्य जनतेचे कंबरडं मोडलं आहे. महागाईच्या वाढत्या दराने चिंता वाढली आहे. मार्च महिन्याच्या महागाई दरात मोठी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मार्च महिन्यात महागाई दर १४.५५ टक्क्यांवर पोहचला आहे. सरकारनं ही आकडेवारी जारी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीत महागाईचा दर १३.११ टक्के इतका होता तर जानेवारीत १२.९६ टक्के महागाई दर होता. मूल्यांकनाच्या आधारे महागाई दर वाढल्याने त्याचा फटका सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर होत असतो कारण लोकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात ही वाढ होऊन वस्तू महाग होतात. डब्ल्यूपीआयचा अर्थ होलसेल प्राइस इंडेक्स आहे. याठिकाणी मालाच्या किंमतीचे दर कळतात. मार्च महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंची घाऊक महागाई दर ८.४७ टक्क्यांवरून ८.७१ टक्के इतका झाला आहे. इंधन आणि वीज महागाई दर ३१.५० टक्क्यांवरून ३४.५२ टक्क्यांवर पोहचला आहे.

बटाट्याचे घाऊक दरातही वाढ झाल्याचं दिसून येते. बटाट्याचा दर १४.७८ टक्क्यांवरून २४.६२ टक्के वाढला आहे. कांद्याचे घाऊक दर २६.३७ टक्क्यांवरून जास्त झाला आहे. अंडी, मांसाहार दर ८.१४ टक्क्यांवरून ९.२४ टक्के इतका झाला आहे. गेल्या ४ महिन्यात क्रूड ऑयलचे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर ६.९५ टक्क्यांवर पोहचला आहे. १७ महिन्यांतला हा सर्वाधिक दर आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर ६.०७ टक्के इतका होता. खाण्या-पिण्याच्या वस्तू महागल्याने गृहणींचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले असून त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच जनतेला महागाईचे तीव्र चटके बसत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. वेळीच योग्य निर्णय घेऊन अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंका देशासारखी होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशात आज कमालीची महागाई वाढली आहे. रोज पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढत आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे हैराण झाले आहे. मोदी सरकार विरोधात जनतेत कमालीचा रोष आहे. त्याकडे दुर्लक्ष होण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *