![]()
महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । उन्हाळी सुट्टीत बच्चे कंपनीला घेऊन गावी जाण्याचा प्लॅन आखणाऱया चाकरमान्यांसाठी खूशखबर आहे. कामगारांच्या संपामुळे गेले साडेपाच महिने आगारात थांबलेली एसटी आता गावागावात सुस्साट धावणार आहे. तब्बल 70 हजार कर्मचारी डय़ुटीवर हजर झाले असून 22 एप्रिलपासून ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी पुन्हा त्याच जोषात आणि त्याच वेगात धावेल असे संकेत आहेत.
संपामुळे ग्रामीण भागातील एसटीची वाहतूक थांबली होती. त्यामुळे सर्वांचेच हाल झाले होते. उन्हाळय़ाच्या सुट्टीत कुटुंबाला गावी कसे घेऊन जायचे असा प्रश्न चाकरमान्यांना पडला होता. मात्र तो प्रश्न आता सुटेल.
22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हा असे आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱयांना दिले.
मंगळवारी 7,435 कर्मचारी कामावर हजर झाले असून हजर झालेल्या एकूण कर्मचाऱयांची संख्या आता 69,082 इतकी झाली आहे. यात सुमारे 24 हजार ड्रायव्हर तर 19,500 कंडक्टर यांचा समावेश आहे.
सोमवारी महामंडळाने राज्यभरात 23 हजार 760 फेऱया चालवीत प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न केला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 26 हजार कर्मचारी नव्याने कामावर हजर झाले आहेत.