महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२५ एप्रिल । पुणे । शहराच्या मध्यवर्ती भागातील एका दुकानामध्ये एक ग्राहक सातत्याने मोजक्याच वस्तू घेत असे. त्या वस्तूंचे बिल ग्राहक कायम त्याच्या मोबाईलवरून दुकानदाराकडील क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन करीत असे. बिल दिल्याचा मोबाईलवरील स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवून तो निघून जात असे. रात्री हिशोब करताना मात्र त्या ग्राहकाचे बिल जमा होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तो ग्राहक पुन्हा त्यांच्या दुकानाकडे फिरकलाच नाही, अशा पद्धतीने सध्या बनावट मोबाईल स्क्रीनशॉटचा वापर करून छोटे-मोठे विक्रेते, व्यावसायिकांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. विशेषतः बनावट मोबाईल स्क्रीनशॉट तयार करून त्याद्वारे गंभीर गुन्हे करण्याच्याही काही घटना घडत असल्याची सद्यःस्थिती आहे.
काही व्यक्तींकडून विविध मोबाईल ॲपचा वापर करून बनावट स्क्रिनशॉट तयार केले जातात. त्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण, खासगी चॅटिंग, अश्लील मेसेज पाठविल्याचे दाखविले जाते. त्यानंतर हेच स्क्रीनशॉट खरे असल्याचे भासवून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून नागरीकांना ब्लॅकमेल केले जाते. तसेच पैसेही उकळले जातात. या गंभीर प्रकाराचा राजकीय, प्रशासकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील व्यक्तींना फटका बसत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर होत आहे. त्याचबरोबर मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याची सद्यःस्थिती आहे.