महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधावरुन जशास तसे उत्तर देण्याची भाषा केल्यानंतर भारतानेही सुनावलं आहे. “भारत आपल्या शेजारी देशांना व करोना व्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करेल. त्यामुळे यावरुन कुठलेही अंदाज बाधू नका तसेच राजकारणही करु नका” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.
भारतावर अवलंबून असलेल्या शेजारी देशांना आम्ही हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन आणि पॅरासीटेमॉल औषधांचा पुरवठा करणार आहोत असे श्रीवास्तव यांनी सांगितले. “COVID19 ची भयानकता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय समुदायाने मानवतेच्या दृष्टीकोनातून एकजूटता आणि सहकार्य केले पाहिजे ही भारताची सुरुवातीपासून भूमिका आहे. आमच्यावर अवलंबून असलेल्या देशांना आम्ही हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन आणि पॅरासीटेमॉल औषधांचा पुरवठा करु” असे श्रीवास्तव म्हणाले.
“अनावश्यक वाद निर्माण करु नका. देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतर अन्य देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करण्यात येईल” असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. भारताने औषधाच्या निर्यातीवर बंदी का घातली ? यावर श्रीवास्तव म्हणाले की, “सर्वप्रथम आपल्या देशातील जनतेसाठी औषधांचा पुरेसा साठा करुन ठेवणे हे कुठल्याही जबाबदार सरकारचे पहिले कर्तव्य आहे”