महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. पण यावर्षीची 14 एप्रिलची आंबेडकर जयंती कोरोना साथीच्या नँशनल लॉकडाऊनमुळे आपआपल्या घरातच साजरा करा, असे आवाहन बाबासाहेबांचे वारसदार आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यामुळे गुढीपाडवा, रामनवमीप्रमाणे आता आंबेडकर जयंतीदेखील रद्द करण्यात आली आहे.
14 एप्रिलच्या आधी नँशनल लॉकडाऊन संपत असल्यामुळे आंबेडकर जयंती सार्वजनिकरित्या साजरी करण्याचे काही आंबेडकरी अनुयायांनी योजिले होते. पण महाराष्ट्रातील व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंबेडकरी अनुयायांनी जयंतीच्या नावाखाली अजिबात घराबाहेर पडू नये, असेही आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.
तसेच कार्यकर्त्यांनी जयंतीच्या नावाने गोळा केलेली वर्गणी कोरोना बाधित गरजूंना वाटप करावी, असेही आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. दरम्यान, भारतात कोरोनाची साथ अद्याप दुसऱ्या टप्प्यात आहे. याचा अर्थ ही साथ कम्युनिटी स्प्रेडच्या स्वरूपात पसरलेली नाही.