महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल । गेल्या काही दिवसात चर्चत असलेल्या धर्मवीर या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. धर्मवीर आनंद दिघे (anand dighe) यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. नुकताच हा लुक रिव्हिल झाला असून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले आहेत. या चित्रपटात बाळासाहेब असणार का, त्यांची भूमिका कोण करणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. पण नुकत्याच आलेल्या ‘गुरुपौर्णिमा’ या गाण्यातून बाळासाहेबांचे रूप दिसले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तरडे (pravin tharde) यांनी केले आहे.. या आधी ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ असे दर्जेदार चित्रपट प्रवीण यांनी दिग्दर्शित केले आहेत. तर ‘सरसेनापती हंबीरराव’ हा त्यांचा बहुचर्चित आगामी चित्रपट आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रोमोला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यानंतर ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणे रिलीज झाले. या गाण्याला एका दिवसात २० लाख लोकांनी पसंती दर्शवली. या गाण्यामध्ये बाळासाहेबांची (balasaheb thackeray) झलक दिसली. बाळासाहबांचे हे रूप पाहून चाहते भावुक झाले.
पण ही भूमिका साकारणारा नट कोण याबाबत अनेकांना माहित नाही. ही भूमिका ‘मकरंद पाध्ये’ या अभिनेत्याने साकारली आहे. ‘गुरुपौर्णिमा’ या गाण्यातून मकरंद बाळासाहेब ठाकरे त्यांच्या रूपात चाहत्यांच्या भेटीस आले. मकरंद एक उत्तम अभिनेते असून गेली अनेक वर्षे ते नाटक, चित्रपट या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. अनेक नाटकांच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. मकरंद पाध्ये यांची छायाचित्रात विशेष मुसाफिरी असून त्यांची अनेक छायाचित्र प्रसिद्ध आहेत. त्यांनी साकारलेले बाळासाहेब चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून अनेकांनी बाळासाहबांची आठवण झाल्याचे सांगितले आहे.