महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल । महागाईचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महागाईमुळे आधीच स्वयंपाक घरातील बजेट बिघडलं असताना आता भाज्याचे दरही वाढले आहेत. भाज्यांच्या वाढत्या भावांमुळे मुंबईकरांचे खिसे रिकामे होताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे एलपीजी सिंलिडरचा भाव वाढत असताना आता भाज्याही महाग झाल्या आहेत. इंधनांच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने भाजांचे दरही वाढताना दिसत आहेत.
मुंबईत मार्केटमध्ये लिंबू प्रत्येकी २० रुपयांना मिळत आहे. येथील एका भाजी विक्रेत्याने सांगितले की, ‘मिरचीचे दर ८० ते १०० रुपयांवरून १६० ते २०० रुपये किलो झाले आहेत. तर हिरवे वाटाणे २०० रुपये किलो झाले आहेत.’ वाढता उन्हाळा आणि पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे.
महागाईमध्ये लिंबू अव्वल
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईत सर्व भाज्यांची सरासरी किंमत 60-80 रुपये प्रति किलो होती. मात्र पूर्वीच्या तुलनेत हे दर आता 80-120 रुपये प्रति किलो झाले आहेत. खार बाजारातील किराणा व्यापारी राजा पाटील यांनी सांगितले की, ’10 ते 15 रुपयांना विकला जाणारा लिंबू महागड्या यादीत पहिला आहे. गाजर 40 ते 60 रुपये किलोवरून 40 ते 60 रुपये किलो झाले आहेत. तर, चवळीच्या शेंगांचे भाव 200 रुपये किलो आहे. पालक आणि कोथिंबीरच्या जुड्या आधी 10 रुपयांना विकल्या जात होत्या, त्या आता 20 रुपयांना विकल्या जात आहेत.