दानशूर व्यक्तीही सरसावले मदतीला
महाराष्ट्र 24: पिंपरी चिंचवड : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. अशा नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून ‘पुन्हा एक हात मदतीचा’ या उपक्रमाच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमधील १० हजार गरजु कुटुंबियांची जबाबदारी स्वीकारली आहे. अशा नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात येणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरातील काही दानशूर व्यक्ती देखील मदतीसाठी सरसावले असून अवघ्या १२ तासांमध्ये २ हजार १८० पेक्षा जास्त कुटुंबांची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, कोरोनामुळे नागरिकांची दैनंदिन जीवनशैली विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागण्याची भीती आहे. त्यामुळे गरजू कुटुंबियांना मदत करण्यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन केले आहे. त्याअंतर्गत एका कुटुंबाला मदत करण्यासाठी ४०० रुपयांची मदत करावी, अशी अपेक्षा आहे. तसेच, आर्थिक मदत किंवा जीवनावश्यक वस्तुंचे पॅकेज खरेदी करुन देता येईल. तसेच, पॅकेजची किंमत बँक अकाउंटवर पाठवता येणार आहे.
जीवनावश्यक वस्तुंच्या पॅकेजमध्ये ३ किलो तांदूळ, २ किलो पीठ, १ किलो तुरडाळ, १तेल पॅकेट, १ मीठाचे पॅकेट, ५० ग्राम मिर्ची पावडर, ५० ग्राम हळदी पावडर आदी वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे.
कोरोना विषाणु संसर्ग लागू केलेल्या लॉकडाउन परिस्थितीत गेल्या १० दिवसांत परिसरातील गरजुंना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत सुरू आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता आपणाकडूनही मदतीची अपेक्षा असून या मदत कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे. ज्या व्यक्तीस मदत करावयाची असेल त्यांना मदतीसाठी डॉ. निलेश लोंढे (9881572395), संजय पटनी (9822217163) आणि विनय रावळ (96899117031) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
*या व्यक्तींनी घेतली गरजू कुटुंबांची जबाबदारी…*
अंकुश पाटील – 63 कुटुंब , विजय फुगे-70 कुटुंब , विजय झवेरी -1000 कुटुंब , रवीजी लूमकड- 300 कुटुंब , राणा भैया-500 कुटुंब , संतोष मोरे आणि मित्र परिवार – 50 कुटुंब , नंदू दाभाडे- 50कुटुंब , शिवराज लांडगे-40 कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे.
*आमदार लांडगेच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद…*
शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तवास आहे. लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद असून हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता लक्षात घेता आमदार लांडगे यांनी अशा गरजूंना मदतीचे आवाहन केले होते. त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला असून दोन दिवसात 3890 जणांनी मदत दिली आहे. चिखली, तळवडे, रूपीनगर, मोशी, आदर्श नगर, खंडोबा माळ या भागातील गोरगरीबांना मदतीचे वाटप करण्यात आले.
शिवाय ज्यांना अशी मदत पोचवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून ज्याला कुणाला कार्य करावयाचे असेल अशा इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.